जयंत पवार लिखित ‘अधांतर’ (Adhantar) हे मुंबईतील कापड गिरण्यांच्या ऐतिहासिक संपामुळे उद्ध्वस्त झालेल्या एका गिरणी कामगाराच्या कुटुंबावरील वास्तववादी नाटक आहे。गिरणी बंद पडल्यामुळे उद्भवलेली बेकारी, आर्थिक विवंचना आणि त्यातून कुटुंबातील नातेसंबंधांमध्ये निर्माण झालेला तणाव यावर हे नाटक भाष्य करते.
नाटकाचे कथानक, अतिशय संवेदनशील पद्धतीने गिरणी कामगारांचे वास्तव आणि त्या काळातील मुंबईची परिस्थित मांडते。
बाबा हा कुटुंबातील मोठा मुलगा आहे. पण त्याच्या लेखी तो नोकरीसाठी जन्माला आलेला नाही. साहित्य वैगेरे गोष्टींसाठी त्याचा जन्म झाला आहे. साहित्यात त्याला मोठ काम करायचं म्हणून तो जबाबदारी घेत नाही.
त्या पात्राचा सखोल अभ्यास करण्यासाठी संपूर्ण नाटक वाचणं गरजेच आहे.
Script:

बाबा: मला नोकरीच करायची नाहीये हे यापूर्वी अनेकदा क्लिअर केलंय. पूर्वी केली होती ना एक नोकरी?
आई: चार म्हैन्यांत सोडलीस.
बाबा: वेळेवर या, मस्टरवर सही करा, तीन लेट मार्कस झाले तर एक सी.एल. कट. असल्या फालतू गोष्टी सांभाळत बसायला माझ्याकडे वेळ नाही. निवर म्हणे बॉसला साहेब म्हणा. अरे हाड्! साले इंग्रज या देशातून गेले पण साहेब म्हणायची गुलामी काही गेली नाही.
आई : तेवढ्यासाठी सोडलीस नोकरी.
बाबा : मी माझं स्वातंत्र्य असं मासिक पगाराच्या मोबदल्यात विकायला नाही काढलेलं. कृपा करून हे लक्षात घ्या आणि कुठल्यातरी छटाक माणसाकडे माझी इज्जत घालवू नका. तो सतीश इथे कशाला येतो माहिताय? मी त्याच्याविषयी चार बरे शब्द लिहावे म्हणून. थुंकी गिळल्यासारखा बोलतो. पण त्या दिवशी जाताना ऐकवून गेला मला. हा चवली-पावलीचा बंडखोर कवी मला म्हणाला, तुझ्या हातून काही मोठं लिहून होत नाही याचं फ्रस्ट्रेशन आलंय तुला. आता दाखवतोच मोठं लिखाण काय ते. नाही साहित्य अकादमी घेऊन गेलो तर नावाचा बाबा धुरी नाही. कमसेकम राज्यपुरस्कार, अगदीच नाही तरी भैरूरतन दमाणी प्राईज कुठे गेलं नाही. बक्षीस हा दुय्यम मुद्दा आहे. मला त्याच्या पलीकडे जाऊन लिहायचंय. पण या साल्यांना बक्षिसाचीच भाषा कळते. मी चॅलेंज घेतो. ग्रेट कादंबऱ्या चॅलेंज घेऊनच सिद्ध झाल्यायत. ‘रणांगण’, ‘कोसला’. मला सार्वच्या ‘ला नोझे’ सारखी कादंबरी लिहायचीय. स्वतःला सोलून, छिनून, काढणारी. ला नोझेचा नायक आंत्वान रोकँतेला झाडाकडे बघत असताना जाणवतं, अस्तित्वात असलेली प्रत्येक वस्तू कारणाशिवाय जन्माला येते, दुबळेपणापोटी जगत राहते आणि योगायोगाने मरून जाते. रोकँतेसारखा मलाही नॉशिया आलाय सगळ्याचा. मलाही माझ्या अस्तित्वाचं समर्थन शोधायचंय आय मस्ट राईट. आय विल राईट अँड शो यू बास्टर्ड…. (स्वतःशीच बडबडत फकाफका धूर काढत राहतो.)