( ही स्क्रिप्ट स्टार प्रवाह वरील मालिका “आई कुठे काय करते” यातील यश देशमुख या पात्रासाठी दिली गेली होती )
Character : Male | Age : 18 to 22 | Language : Marathi
( एक मुलगा एकटाच गिटार वाजवत बसला आहे किंवा गुणगुणत आहे . मनासारखं होत नाही. एक-दोनदा थांबतो. परत पहिल्यापासून सुरू करतो, शेवटी थांबतो. )
यश:
आई… आई… ( कॅमेराला ) आत्ता इथे आई असती तर नं , तर तिने परफेक्ट सांगितलं असतं, माझं काय चुकतंय आणि मी काय करायला पाहिजे. काही काही माणसं असतात नं , ज्यांना… काही फारसं फॉर्मल ट्रेनिंग नसत, पण त्यांना नॅचरली काही गोष्टी येतातच. तसं आईला गाणं येतं. म्हणजे ती शिकलीये गाणं आजी कडून पण तिला ते पुढे कंटिन्यू नाही करता आलं. लग्न, बाबा, मग आम्ही तिघं , आणि आमचं घर.
मी यश देशमुख. आमच्या घरातले बाकी सगळे भेटले असतीलच तुम्हाला. मी नाही भेटलो कारण एक तर… मी माझ्या रूममध्ये यात बिझी होतो… ( गिटार कडे बोट दाखवतो ) आणि दुसरं म्हणजे आमच्या घरी बर्याच जणांना माझी लाज वाटते. आपणहून माझी ओळख वगैरे करून देत नाही ते, मला माहितीये, कारण… कारण… मी… मी त्यांच्यासारखा achiever नाहीये ना. बाबा तर सरळ म्हणतात, हयाच्या फक्त नावात यश आहे! अभिषेक दादाला आणि आजीलाही असंच वाटतं.
ती बारकी ईशा… हाहा.. तिलाही असंच वाटतं. पण मला नाही हो त्यांचा सारखा एमबीए नाहीतर मेडिकल मध्ये इंटरेस्ट, खरच नाहीये. बाबांना मला एमबीए करायचंय. त्यांच्या हट्टासाठी मी समजा अगदी डिग्री मिळवली सुद्धा, तरी मी करणार काय त्यांचं पुढे ? मला करायची नाहीये नोकरी.
मला… मला… म्युझिक करायचय वर्ल्ड म्युझिक… ऐकता तुम्ही ? अहो जगातल जाऊदे, आपल्या देशातल संगीत सुद्धा पूर्ण ऐकून आणि समजून होणार नाही आपलं. मला असं वाटतं मी म्युझिक ऐकायला लागलो न… की मी या जगातच नसतो. इथली स्पर्धा, इथली लोकांनी लावलेली labels, सक्सेस च्या व्याख्या, या सगळ्यापासून दूर असंतो मी, आणि मला तिथेच असायचंय , पण हे कळतच नाही बाबांना, आणि मग काय होतं, मला बोलताच येत नाही त्यांच्याशी. कुणाशीच नाही. असं वाटतं आपलं बोलणं कळणारच नाहीये यांना मग कशाला बोलायचं… मग मी फक्त आईशी बोलतो. कारण आईला कळत. तिला मी जे बोलत नाही, त्याचेही सूर कळतात.
माझी आई great आहे अहो. आई, आई आहे… ह्या सगळ्यांमध्ये राहूनही ही , मॉम नाही झालेली ती. तिच्या साडीचा पदर तसाच मऊ आहे, जसा मी लहान असताना होता. बाकी सगळे बदलले म्हणून त्या पदराच्या जागी टिकल्या लावलेली ओढणी नाही आली.
दिवसभर सगळ्यांकडून सगळी निगेटिव्ह बोलणी ऐकली, की रात्री फक्त थोडासा वेळ आईच्या मांडीवर डोकं ठेवतो मी. तुम्हाला काय सांगू काय वाटतं… मनात म्युझिक परत सुरू होतं.
माझी खूप इच्छा आहे… एक दिवस मी इतकं मोठं काहीतरी करावं, की माझी आई खुश होईल. बाकीचे… मी काहीही केलं तरी कधीच खुश होणार नाहीयेत. पण मी आई साठी काहीतरी करेन … माझ्या आणि तिच्या… म्युझिकच काहीतरी करेन. हे मी माझ्या आईसाठी स्वतःला दिलेलं वचन आहे. ( परत गायला लागतो )…