Ti Phulrani Monologue.. Audition Script For Female

पु.ल. देशपांडे लिखित ” ती फुलराणी ” हे नाटक George Bernard Shaw यांच्या “Pygmalion” या नाटकावर आधारित आहे. पु.लं च्याच शब्दांत “ती फुलराणी” म्हणजे “स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसाची कथा !” उच्चारशास्त्राचा प्रोफेसर अशोक, फुलं विकणाऱ्या गावठी मंजुळेला “तीन महिने ही मुलगी माझ्या ताब्यात मिळू देत, राजघराण्यातील राजकन्या म्हणून एखाद्या समारंभात फिरवून आणेन हिला ” अशी पैज लावतो आणि मंजुळेच्या भाषाशुद्धीचा मजेदार प्रवास सुरु होतो ! अशोक मास्तरची झिकझिक नकोशी झालेल्या मंजुळेचे हे स्वगत आहे. Ti Phulrani Monologue


मंजुळा :

” असं काय मास्तरसाहेब ? गधडी काय? नालायक, हरामजादी ? थांब..
थांब तुला शिकवीन चांगलाच धडा, तुज्या पापाचा भरलाय घडा !
मोटा समजतो सोताला मास्तर, तुजं गटारात घाल जा शास्तर
तुजं मसणात गेलंय ग्यान, तुज्या त्वांडात घालीन शान
तुजा क, तुजा ख, तुजा ग, तुजा घ, मारे पैजंचा घेतोय इडा !
तुला शिकवीन चांगलाच धडा !
तुजा उतरीन समदा माज, तवा येशील गुंडाळून लाज
माजी चाटत येशील बुटां, मी म्हनन, काय आज इकडं कुठं ?
हात पसरून मागशील भीक, मी म्हनन, जरा शुद्ध बोलायला शीक
मग उडवून हात, सांगीन धरायला वाट, चाल भाईर मुकाट
उगं वळवळ करतोय किडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !
तुला दाखवतेच बघ चोरा, तू बघशील माझा तोरा,
ओ हो हो, आहाहा, ओ हो हो, आहाहा, हाऊ स्वीट, हाऊ स्वीट
लव्हली, चार्मिंग, ब्युटी, हाय, समदे धरतील मंजूचे पाय
कुत्र्यावानी घोळवीत गोंडा, तरन्या पोरांचा दारात लोंढा
हाय मंजू, हाय दिलीप….हाय मंजू, हाय फिलीप
मंजू बेन केम छो, हाऊ डु यू डु,
कम, कम, गो हेन्गिंग गार्डन, आय बेग युवर पारडन ?
कुनी आनतील सिलीकची साडी, कुनी देतील मोत्यांची कुडी
कुनी घालतील फुलांचा सडा ! तुला शिकवीन चांगलाच धडा !
मग? कुठूनसा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होउन स्वार
नदरेला जेव्हा नदर भिडल, झटक्यात माझ्या पायाचं पडल
म्हनल,रानी तुज्यावर झालो फिदा, क्या खुबसुरती, कैसी अदा
माग, माग, काय हवं ते माग, प्यारी माज्यावर धरू नकोस राग
मी मातर गावठीच बोलीन, मनाची गाठ हळूच खोलीन
गालावर चढल लाजेची लाली, नदर जाईल अलगद खाली
म्हनेन त्याला, ह्ये काय असं ? लोकांत उगंच होईल हसं
कुंपणापातर सरड्याची धाव, टिटवीनं धरावी का दर्याची हाव
हिऱ्याच्या कंठ्याला सुतळीचा तोडा? गटारीच्या पान्याला सोन्याचा घडा ?
मग राजाच येईल रथात बसून, म्हनंल, कसं बी कर, पन हो माझी सून
दरबारी धरतील मुठीत नाक, म्हनत्याल राजाचा मान तरी राख
तोरणं बांधा नि रांगोळ्या काढा, त्या अशोक्याला शिकवीन चांगला धडा !
मंग मंजू म्हनल, महाराज ऐका, त्या अशोक मास्तराला बेड्याच ठोका
शिशाचा रस त्याच्या कानांत वता, आन लखलख सुरीन गर्दन छाटा
मास्तरला घोड्याच्या शेपटाला जोडा, आन पालटून काढून चाबकानं फोडा.
महाराज म्हनत्याल, भले हुशार, धाडून द्या रं घोडस्वार
हां हां हां हां (हसते )
जवा राजाचं शिपाई धरत्याल तुला, म्हनशील मंजे सोडीव मला
धरशील पाय आन लोळशील कसा, रडत ऱ्हाशील ढसाढसा
तुझा ए, तुझा ओ, तुझा न, तुझा ण, तुज्या श्या, तुजं वसकन आंगाव येणं
भोग आता गप तुज्या कर्माची फळं, तुज्या चुरूचुरू जिभेला कायमचं टाळं
महाराज म्हनत्याल, ह्याची गर्दन तोडा, मी म्हनन, जाऊ द्या, गरिबाला सोडा
तू म्हनशील, मंजुदेवी आलो तुला शरन
मी म्हनन, शरन आल्यावं देऊ नये मरन. “

Leave a Reply